Wednesday, 22 October 2014

वडीलांचं छत्र...

वडीलांचं छत्र...

आज बरोबर २३ वर्षं झाली माझ्या पप्पांचं निधन होऊन. ज्यांच्यावर मी जगात सगळ्यात जास्त प्रेम केलं त्यांच्याशिवाय गेली २३ वर्षं राहतोय.  असा एकही दिवस नसेल की त्यांची मला आठवण नाही झाली. आजही त्यांची मला पावलोपावली कमी जाणवते.

१९९१ ला दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी काळाने घातला आणि माझं पित्रुछत्र हरपलं. त्यानंतर आईने माझा आणि बहिणीचा धीराने सांभाळ केला पण पप्पांची कमी सतत जाणवतेच. माझं काॅलेज शिक्षण चालू असतानाच मी थोड्या थोड्या चारोळ्या, कविता करू लागलो, अर्थातच कोणालाही न दाखवताच. एक सल मनात कायम आहे की इतक्या वर्षांत मी पप्पांबद्दल काहीच लिहिलं नाही...

शब्दशः शेकडोवेळा प्रयत्न केला लिहायचा पण मनातून शब्द बाहेर पडायच्या अगोदरच डोळ्यांतून अश्रू यायचे आणि काहीच लिहिलं जायचं नाही. ३,००० पेक्षा जास्त चारोळ्या विविध विषयांवर लिहिल्यानंतरही वडिल ह्या विषयावर लिखाण नाही झालं...

त्यांची कमी तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जाणवेल पण पार्थच्या (माझा मुलगा) जन्मानंतर मी त्याच्यात माझं बालपण बघतोय. माझ्या आणि पप्पांच्या बर्याच सवयी सारख्या होत्या अगदी खाण्याच्यासुद्धा. त्यात दोन खास सवयी, पहिली करंजी... दोघांचीही जीव की प्राण... आणि दुसरी सवय म्हणजे फटाके वाजवणे.. अगदी मी पहिल्या इयत्तेत असल्यापासून सुतळी बाॅम्ब, डबल बार वगैरे फटाके वाजवायचो... पप्पा गेल्यानंतर फटाके आणि करंजी ह्या बाबतीत मी जणू स्वतःशीच अलिखित नियम केला की जिथपर्यंत मी बाप होत नाही तिथपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी मला वर्ज्य. आणि मी बाप झाल्यावर परत त्या दोन्ही गोष्टी सुरू केल्या...

माझे वडील गेले तेव्हा मी ११ वर्षांचा होतो, तसं बघितलं तर अजाणतं वय. तरीही पप्पांसोबतचा प्रत्येक क्षण मला पुर्णपणे आठवतोय... त्यांचा राग, ओरडणं पण त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त माझ्यावर त्यांचं असणारं निरतिशय प्रेम. त्या प्रेमाला तोडच नाही.. इतक्या प्रेमळ माणसाची साथ नसण्याचं दुःख उराशी कवटाळूनच मी आयुष्य जगतोय. वडीलांचं छत्र नाही हाच काटा माझ्या ह्रुदयात सतत टोचतोय...

कदाचित माझं वरचं लिखाण भरकटलेलं असेलही पण मी आज पप्पांबद्दल काही शब्द लिहू शकलो ह्याचाच मला खुप आनंद आहे. हे लिहित असताना डोळ्यातून अश्रू वाहत होतेच पण ३,००० पेक्षा जास्त चारोळ्या लिहूनही जेवढं समाधान मनाला वाटलं नसेल तेवढं समाधान आज मला वाटतंय...
         © आशिष दोशी...
         २१/१०/२०१४